हि आमची वानरसेना. साधारण दोनेक वर्षांपूर्वी हि मंडळी माझ्या संपर्कात आलीत. तस माझी आणि यांची भेट व्हायला पंधरवडा उलटतो म्हणा. तर... हे कुठून येतात कुठे जातात त्यांनाच माहित. पण आले कि चांगलं अर्धा पाऊण तास परड्यातली झाडं हुंदडणे आणि आहे नाही तेवढ्या कवळ्या पानांचा, फुलांचा, त्यावरच्या मोहोर, शेंगा वगैरेंचा फडशा पाडणे, हा यांचा आवडता छंद.
खरं सांगायच तर पहिल्यांदा जेव्हा यांचा हा हैदुस बघितला होता, तेव्हा जाम टरकलेलो मी. वाटलं, आता काय खरं नाई. उड्या मारून मारून आमच्या घरावरल्या खापऱ्यांचा पाक चुराडा करत्यात ही, पण नाही ओ. एकाबी खापरीला धक्का न्हवता लागला. कदाचित 'जिस थाली मे खाया, वहाँ छेद नई करते,' जे जन्मजात शिकून आलेली प्राणीजात असावी हि.
तर आज यांच्याबद्दल लिहायला, फार काही खास कारण न्हवतं. नेहमी प्रमाणेच, साहेब मंडळींचा हा एक दौराच होता म्हणायचा इकडचा. साधारण विसेक असावा यांचा आकडा, पण आमच्या गरीब कॅमेरातल्या गरीब फोटूत दहाचं मावलीत. पण हा, मि कॅमेरात आलो नाही म्हणून एकबी रुसलं नाही बर का. सगळी कशी, खाण्यात मग्न. कोपऱ्यात एक पिल्लू तेवढं आईला बिलगून बसलं हूत. मात्र अधून मधून बगत हुत माझ्याकडं. बहुदा, विचार करत असावं, "अरे, हि बाई पण जरा जरा आपल्या सारखीच दिसत्या कि. अंगावर काय तर घातलय आणि दोन पायावर सरळ उभारल्या, एवढाच काय तो फरक. आई पण कधी कधी उंच फांदी वरचं काय तर ओढायच असेल तर उभारत्याच की अशी." त्या पिल्लाचा असला काय तर विचार सुरु असावा पण त्याच्या आईचा हात, घास भरवायला जसा तोंडापाशी आला, तशी माझ्या वर स्थिरावलेली नजर, फिरवली त्यानं. त्याची आई त्याला, वाल्याच्या कवळ्या शेंगा भरवत होती. ते पण आपलं गप गुमान, कुठलंही नाटक न करता खात बसलेलं. हे नको ते नको, असलंच पाहिजे, तसलंच पाहिजे, ह्याच प्लेटमधे पाहिजे, त्याच कप मध्ये पाहिजे, समोर काय तर इंटरटेनमेंटला पाहिजे असले नखरे अजिबात नाहीत. आया लय सुखी असतील असल्या पोरांच्या. नाही तर आपली मनुष्य पिल्ली. जरा लईच लाड अन डिमांड चालत्यात आजकाल त्यांचे. नाई?
त्यांच ते निरागस खाणं अन बेफिकिर, बेभान जगणं न्याहाळत असताना, सहज मनात विचार आला, फोटोत कॅप्चर करायच का हे सगळं? विचार आवडला म्हणून मोबाईलचा कॅमेरा ऑन केला, फ्रेम सेट करत हुतो, तेवढ्यात, त्यातलं एक झेपावल माझ्या कडं. म्हटलं, "आरआरआर... लागला चुना आता. जातंय वाटतं घेऊन माझा मोबाईल." गल्लीतल्या एखाद्या रोमिओन आपली हिरोईन आलेली बघून, चौकात, एकदम पंचेचाळी डिग्रीला काटोकाट टर्न मारावा, अगदी तसा ह्या हिरोन पण मारला. अर्थात तो कुठल्या हिरोईन साठी न्हवता म्हणा, किंवा माझ्या मोबाईल साठी तर नक्कीच न्हवता, तो होता, शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावरच्या त्या लुसलुशीत फांदीवरल्या, मस्त पोपटी रंगाच्या कोवळ्या पानांसाठी. हुश्श केलो मी, ते माकड, तिकडं गेलेलं बघून. मोबाईलच काय नाई ओ, त्यो फुटला,तुटला किंवा त्यानं नेलाच, तर नवा बी घेता येईल, पण आजकाल ते वर्क फ्रॉम होम मुळं त्यात ऑफिसचा सेटअप पण हाय ना. मोबाईल गेला, तर परत कोन करत बसणार बाबा परत एवढ. नकोच. त्यामुळं त्यांची सिनेग्राफी करायचा आलेला माझा मूड, लगेच आवरता घेतला मी.
निसर्ग आणि त्याच्या अशा विविध पिल्लां मध्ये, मी एकदा हरवून गेलो कि त्यातन बाहेर पडणं जरा जडच जातंय मला. पण एक आवाज आला, अन, कुठं तर वेगळ्याच विचारात हरवलेल माझं ध्यान खटकन भानावर आला. अर्थात तो आवाज कसला होता, हे सोशल मीडियाच्या भाषेत सांगायच झालं, "रिंगटोन ऑफ द इयर २०२० किंवा सॉरी आय वॉज ऑन म्युट, अॅम आय ऑडीबल वगैरे जिथं सर्रास सुरु असतं तेच... वर्क फ्रॉम होम चा सर्वेसर्वा, आपलं, मायक्रोसॉफ्ट टीम्स."
साडेपाच वाजले होते, टीम मधल्या कुणीतरी ऑलरेडी मिटिंग सुरु केली होती. त्यामुळं जॉईन करणं भाग होत. अर्थात हि मंडळी परत पधरवड्यानं भेटणार आहेतच म्हणा. सांगता आलं असत, तर नक्की सांगितलं असत यांना आज, भावांनो, नेक्स्ट टाइम जरा लवकर या. म्हणजे कस, निवांत बसता येईल... चर्चेला ओ...
© आराधना खोत ( १३.०१.२०२२ )