२०२२ च्या उंबरठय़ावर... तिमिरातूनी तेजाकडे

बघता हेही वर्ष सरल आणि २०२२ उजाडल. तसा हा क्षण दरवर्षीच येतो. म्हणजे नवीन वर्ष, नवे संकल्प, नवी स्वप्न अन बरच काही. पण यंदा हाच विषय जरा वेगळा आहे. थोडंस खोलात, २ वर्ष मागेच जाऊ म्हणजे जरा लिंक लागेल. २०१९ च्या शेवटच्या दिवशी सगळ्यांनी अगदी नेहमी प्रमाणे नव्या वर्षांची अन त्या सोबत रंगवल्या जाणाऱ्या स्वप्नांची आखणी केली. पण कोविड न कसा त्या स्वप्नांचा चूराडा केला हे आता मी नव्यान सांगणं नकोच. असो. कसबस तेही वर्ष सरल. थोड्या जास्त प्रमाणात अगदी प्रत्येकान तो मानसिक किंवा शारीरिक ताण झेलला. न भूतो न भविष्यति अशा थाटात आलेल्या त्या अदृश्य कोरोनान भल्या भल्यांना पण अक्षरक्षः झूकवल. कलियुगातल्या या सुपरफास्ट टाइम ला जणू कान पिरगाळून सांगितलं त्यानं, "अरे, किती धावशील? थोडं थांब. काय घेतलं, काय सोडलं याचा जरा हिशोब लाव. स्वतःला कितीही हुशार समजलास तरी इथं या विश्वात असं काहीतरी नक्कीच आहे आणि असेल ज्याचा तुला कधी अंदाजच नाही येणार." ऐकायला थोडंस फिल्मी वाटलं तरी यात न पटण्यासारख तर नक्कीच काही न्हवत हे तुम्ही आम्ही पण जाणल. 


पहिला लॉकडाऊन पडला अन आख्ख जग जेव्हा हॅन्डब्रेक मारल्यासारखं जागच्या जागी थांबलं तेव्हा जी अनिश्चितता होती ती येणाऱ्या काही महिन्यांत बऱ्यापैकी कमी झाली. ऑफलाईन वरून सगळं ऑनलाईन वर शिफ्ट झालं. बहूसंख्य लोकांच लसीकरण पण झालं. लोकं पुन्हा कामावर परतलीत. अन वाटलं जगाची हि गाडी छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा रूळावर आली. इथंवर येता येता २०२० संपून २०२१ उजाडल होत. आपसुकच २०२१ च्या नववर्ष संकल्पा मध्ये तोच जुना जोष होता. २०२०, हे जगाला पडलेल एक वाईट स्वप्न समजून सगळे जण पुन्हा आपापल्या मार्गाला लागले होते. नव्या वर्षात स्वतः बद्दल तीच जुनी फॉर ग्रांटेड स्वप्न होतीत. पण २०२१ मध्ये कितीदा ह्या कोरोनान, वेगवेगळय़ा व्हेरीयंटच्या नावानं डोकं वर काढून जगाला दाखवून दिलं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. त्यामुळे २०२१ च्या पाहिलेल्या त्या फॉर ग्रांटेड स्वप्नांचा सुद्धां कमीजास्त प्रमाणांत का असेना असाच चूराडा झाला. इथं मला हे फॉर ग्रांटेड मुद्दाम म्हणावस वाटलं कारण - इतकी वर्ष अशी नवी स्वप्न पाहिली (सत्यात किती उतरवली हे थोडं बाजूलाच ठेऊ), स्वतःला कुठंल्या तरी टार्गेट साठी पुश केलं. काहींनी ते मिळवलं सुद्धा. पण खरंच कधी क्षणभर मनाला कुरवाळल, ओंजारल अन विचारल का की बाबा तुला काय पाहिजे? अगदी न चुकता दरवर्षी शारीरिक फिटनेसच टार्गेट केलंस पण मेंटल फिटनेस च काय? रॅट रेस मध्ये धावत सूटलास, सोशल मीडियाच्या डीपी आणि रिल्स साठी कसलेबसले डायट करून स्वतःच्या रंगरुपाला बदलत बसलास , बँकेतला बॅलन्स वाढवायच्या नादात भलते सलते उद्योग करत जिवाची अगदी दैना करत सुटलास... पण खरंच तुला हे सगळं अगदी मनापासून करू वाटल म्ह्णून केलंस इतकी वर्ष की सगळे पळतायात म्ह्णून तु पण आपलं त्या कळपात खाली मुंडी घालून एका मागून एक चालणाऱ्या मेंढरांगत कधी चालत तर कधी पळत राहिलास ? 


आज २०२२ च्या उंबरठय़ावर पाऊल ठेवताना हे सगळं मुद्दाम आठवू वाटतंय कारण, निदान या वर्षी तरी मला ती फॉर ग्रांटेड स्वप्न बघायची नाहीएत. थोडस प्रॅक्टिकल व्हायचय. बाकीचे करतायत म्हणून मला पण झिरो फिगर किंवा ६ पॅक्स नाही करायचेत. The Great Resignation च्या लाटेत बाकी लोक करतायत म्ह्णून मला पण नाही हाथ धुवून घ्यायचाय. राजासारख तर मलाही जगायचय पण त्यासाठी गाढवासारखं नुसतं राबायच नाहीए. मला काय आवडत, माझा खरा आनंद कशात आहे, मला काय केलं कि छान वाटत, माझं मन कुठं जास्त रमत या सगळ्याचा अगदी बारकाईनं विचार करायचय. 



मी हे सगळं बोलतीय याचा अर्थ असा नाहीए कि मि यंदा नववर्ष संकल्पच नाही करणार. उलट या वर्षी मी थोडा जास्त वेळ घेणार पण स्वतःसाठीचा अन स्वतःने केलेला संकल्प करणार. ज्यात कुणा सोबतची स्पर्धा नसेल, कुणाला पृव्ह करावं म्हणून केलेला अट्टाहास नसेल, असेल तर ते केवळ, स्वतः स्वतःच केलेलं आत्मपरिक्षण, भुतकाळात डोकावून केलेलं स्वतःची ओळख आणि भविष्यात स्वतः कल्पिलेल स्वतःसाठीच एक व्यक्तीमत्व... बास... या वर्षी मला खरच, एकदम खऱ्या अर्थान माझ्याच मरगळलेल्या तिमिरातून लक्ख अशा तेजाकडे जायचय.


© आराधना खोत