स्पीडोमीटर....आयुष्याच!

अंधारी रात्र, रिकामा रस्ता, त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, किंचितसा वाढलेला गाडीचा स्पीड अन त्याला कंट्रोल करणार हातातलं स्टेरिंग... गाडीत कितीही मस्त वाटणारी, मन तल्लिन करून टाकणारी, नाईट ट्रॅव्हलची प्लेलिस्ट सुरु असली तरी, अशा वेळी, एका क्षणासाठी का असेना, आपलं हे मन थोडं भुतकाळात जातं. झाल्या गेल्या किंवा भविष्यात वाढून ठेवलेल्या गोष्टींचा हिशोब आपण मांडतो त्या क्षणी. मीही मांडला, त्या दिवशी... 


दूर पसरलेला तो सुनसान रस्ता कापत असताना, का कुणास ठाऊक, माझी नजर समोरच्या त्या स्पीडोमीटर वर स्थिरावली. शून्या पासन ते अगदी दोनशे पर्यंत आकडे होते त्यात. सगळे कसे शुभ्र, पांढरट रंगातले. पण मध्येच, चाळीस ते साठ वाला पट्टा हिरवा तर लास्ट वाला म्हणजे एकशे चाळीस ते दोनशे वाला पट्टा लाल रंगात होता. टेक्निकली सांगायच झालं तर पहिला पट्टा सेफ ट्रॅव्हल दर्शवत होता तर दुसरा, धोक्याचा इशारा देत होता.


त्याच्या शेजारीच एक बत्ती होती. पेट्रोल (किंवा डिझेल) किती उरलय, जेवढं उरलं, त्यात आपली गाडी अजून किती किलोमीटर जाईल, हे सगळं सांगणारी ती बत्ती. गाडीच्या स्पीडवरून आणि ह्या बत्तीन दिलेल्या संकेतांवरून आपण एक अंदाज तर लावतोच, जितका स्पीड कंट्रोल, तितक जास्त मायलेज आणि तितकी जास्त इकोनॉमी. आपल्या आयुष्याचं पण थोडफार असंच असतं, नाही का? अर्थात गाडीच्या संदर्भात 'इकोनॉमी' म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त अंतर असा हिशोब असला तरी, 'जीवनाच्या' संदर्भातला याचा अर्थ फार काही वेगळा नसावा. म्हणजे बघा कस... 


जितकी जास्त बॅलन्स्ड लाईफ तितकं जास्त मायलेज, तितंक जास्त आयुष्य. थोडा स्पीड वाढला मग तो कामाचा असो किंवा पैसा कमवायच्या शर्यतीचा असो, त्या सोबत आरोग्य, शांती, सुख, निरागसता, साधेपणा वगैरेच्या नश्वरतेचा धोका हा आलाच. आता तुम्ही म्हणाल, "मग आम्ही गाडी काय शो ला घ्यायची का? त्याला पळवायची नाही?" पळवा ना, नक्की पळवा. अगदी हव्या त्या स्पीडने पळवा. पण रस्त्यावरचे नियम पाळायला मात्र नका विसरू. जिथं स्पीड च लिमिट नाही, तिथं कोण अडवतय तुम्हाला. अगदी तसचं, आयुष्यात जिथं स्वतःच्या स्वप्नांना, प्रयत्नांच लिमिट नकोय तिथं बिन्धास्त तुमची गाडी शंभर काय दोनशेच्या स्पीडला पळवा. पण जेव्हा तो बिनालिमिटचा रस्ता संपेल तिथं, मघाशी वाढवलेला स्पीड कमी करायला नका हं विसरू. आख्ख जग पळतयं म्हणून तुम्हीही लिमिटलेस नका पळू. या जगात अशी एकच व्यक्ती आहे, जिला, तुमच्या आयुष्याच्या गाडीच मायलेज किती आहे हे माहितीए, कधी आणि किती पेट्रोल द्यायच हे माहितीय, कुठंल्या स्टॉपला स्वतःला ब्रेक मारून थोडा विसावा घ्यावा असं वाटत, हे माहितीय. क्षणभर विश्रांती घेऊन, तापलेल ते इंजिन कुठं थंड करावस वाटत, ते माहितीय. अर्थातच, ती व्यक्ती, दुसरी तिसरी कुणी नसून, फक्त तुम्ही स्वतः आहात. जास्त काही नको, फक्त आपल्या आयुष्यनामक गाडीचे ते विसावे टीपायला शिका. खरचं, आयुष्य खूप सुंदर आहे. 


आपली गाडी, जितक जास्त अंतर कापणार तितक जास्त, त्यातलं पेट्रोल कमी होत राहणार. जितकी जास्त वर्षे ती तुम्हाला सर्व्हिस देणार, हळू हळू तितकी जास्त, ती कमकुवत होत जाणार. म्हणजेच तिच्या दुरुस्तीची कामं निघत राहणार. हे एकदम साधं सोपं गणित. आयुष्य पण याहून वेगळं ते काय? ९ महिने आईच्या गर्भात राहून एक दिवस या भूतलावर जन्माला आलेलं माणसाच बाळ असो किंवा एखादया इंजिनीअरच्या कल्पक डोक्यातून जन्माला आलेली आणि नंतर कुठल्या तरी फॅक्टरी मधून बाहेर पडलेली नवी कोरी गाडी असो. दोघांचा प्रवास हा थोडाबहुत सारखाच. अस असलं तरी, एक मोठा फरक मात्र नक्की आहे इथं. 


गाडीच स्वतःच असलेलं स्टेरिंग, दुसरं कुणाच्या हातात जाईल अन तो, कस त्या स्पीडोमीटरच गणित मांडून, त्या गाडीचं मायलेज घेईल, हे बिचाऱ्या गाडीच्या हातात नाही. पण हा... मनुष्य नामक प्राण्याच्या हातात मात्र हे सगळं आहे. त्याला स्वतःच स्टेरिंग आहे, स्पीडोमीटर कंट्रोल करायचा ताबाही आहे आणि कसं किंवा किती मायलेज काढून घ्यायच हे गणित सुद्धा आहे. आता ज्याच त्यालाच ठरवायच आहे कि, आयुष्याची ही गाडी इकोनॉमी स्पीडला ठेवायची की समोर स्पीडोमीटर दिसतय म्हणून उगाचच त्याला लिमिटलेस पळवायची...