शाळा बदलतायत

शाळकरी मुलांच्या गराडयात रमणं हा माझा आवडता छंद. काल खूप दिवसांनी हा योग आला. निमित्त होत, उचगाव ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरु असलेला 'स्मार्ट टू ग्लोबल' प्रकल्प व्हिसिट. सरकारी शाळा म्हंटल कि सहसा नजरेसमोर एक टिपिकल चित्र येत, तसचं काहीस माझ्याही नजरेत होतं, पण इथं पाऊल ठेवताच एक वेगळपण जाणवलं. 'इच्छा तेथे मार्ग' याच एक जिवंत उदाहरण आज अगदी जवळून अनुभवता आलं. त्या बद्दल थोडंस....


पहिलंच इम्प्रेशन पडलं ते व्हरांड्यात बसवलेल्या नव्या स्टाईलच्या फरश्यांच आणि वर्गात अंथरलेल्या त्या हिरव्यागार गालिच्याच. अर्थात हे सगळं फक्त चांगलं दिसावं म्हणून नक्कीच न्हवतं. व्हरांड्यातल्या जुन्या स्टाईलच्या काळ्या किंवा वर्गातल्या क्रीम कलरच्या शहाबादी फरश्यांचा तो कठीणपणा मुलांच्या नाजूक पायांना बोचू नये, इतका साधा सरळ पण खोल विचार करणं हि साधी गोष्ट नक्कीच न्हवती, असं मला तरी वाटत. 


वर्ग म्हटलं कि ओळीन मांडलेले बाकडे, त्यासमोर ठेवलेलं एक टेबल, खुर्ची आणि भिंतींवर टांगलेले तक्ते इत्यादी दिसणं म्हणजे जरा टिपिकल. पण यांच्या वर्गात अजून खूप काही होतं. वर्गाच्या दाराबाहेर एक चप्पल स्टॅन्ड, वर सांगितलं तस वर्गभर अंथरलेला हिरवागार गालिचा, हिरवा शालू नेसलेल्या पृथ्वीला जस निळं आकाश शोभून दिसावं अगदी तसच काहीस इथं पण. पूर्वी छतावर टांगलेल्या अन एकट्यानेच गोल गोल फिरणाऱ्या पंख्याच्या सोबतीला आता खूप काही आलेलं इथं, निळ्या रंगात साकारलेली आकाशगंगा, त्यात असलेले ते ग्रह, असंख्य तारे, मानवाच्या प्रगतीच निशाणं म्हणवत, अगदी सुपरवायझरच्या थाटात फिरणारं सॅटेलाईट अन या सगळ्यांना सोबत घेऊन गोल गोल फिरत असलेला तो पंखा, त्याचं वारा जिथंवर जाईल तिथंवर ठेवलेले वर्गातले ते छोटे छोटे पिवळ्या रंगाचे बाकडे, गोड गुलाबी रंगान रंगवलेल्या भिंती, त्यावर काढलेली अभ्यासू तैल चित्रे जस कि बाराखडी, गणित संज्ञा, पाढे, संगीत वाद्य ओळख, दिशा ओळख, वस्तू ओळख, इंग्रजी भाषा ओळख. जुन्या काळ्या फळ्यांना रिप्लेस करुन आलेला पांढरा डिजिटल आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेला खडू-डस्टर वाला हिरवा बोर्ड, बाजूलाच एका कप्प्यात ठेवलेला कॉम्पुटर, त्याच्या बरोबर समोर, थोड़ वरच्या अंगाला टांगलेला प्रोजेक्टर, दप्तराचं ओझं कमी व्हावं या उद्देशान बनवलेलं आणि डाव्या भिंतीला लागून असलेलं लॉकर, कार्यानुभवाच्या तासाला केलेलं काही तरी क्राफ्ट असो किंवा विज्ञानाच्या तासाला लागणार काही सामान असो, ते ठेवायला केलेलं वायव्य कोपऱ्यांतल एक कपाट आणि त्याच्याच शेवटच्या कप्प्यात केलेली, साधारण पाचशे पुस्तकं मावणारी अशी वर्ग-लायब्ररी अन बरच काही. 

वर्गात बसलेल्या मुलांच्या नजरे समोरची भिंत थोडी खास होती. कारण इथं रेखाटलं होत, ते या प्रोजेक्ट चं नाव, मुलांच्या बुद्धिमत्तेला वाव देतील अशी वेगवेगळय़ा प्रवाहाची आणि STEM शिक्षणाची ( विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) चिन्हं. शाळाबाह्य ज्ञानात सुद्धा अपडेट असलेले हे सर सहजच एक गोष्ट बोलून गेले, "कसय ना मॅडम, देश स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांनी मिळून एक स्वप्न पाहिलं. येत्या २० वर्षात शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे. ते सत्यात उतरलं का? हो नक्कीच. अगदी गावागावांत शाळा उभारल्या गेल्या. त्यातून बरीच लोक शिकलीत आणि देश विदेशाच्या क्रांतीत सहभागी सुद्धा झालीत. इथं समोर हे आंतरराष्ट्रीय कंपनींचे लोगो छापलेत त्यापैकी बहुतांश कंपन्यांच्या धुरा आज कोणी भारतीयच चालवतात. खूप आनंद आहे पण केवळ फॉर्मॅलिटी म्ह्णून चालत आलेल्या आणि पटसंख्या घसरु नये या भितीच्या छायेखाली वावरणाऱ्या आमच्यासारख्या काही शाळा जर अशा तंत्रज्ञानासोबत सांगड घालून क्वालीटी एजुकेशन देऊ लागल्या तर एक दिवस नक्की येईल, इथं याच लोगोंच्या ओळीत एका भारतातल्याच विदयार्थ्याने भारतात स्थापित केलेल्या कंपनीचा लोगो पण ऍड होईल. एके काळी फक्त चित्रात बघून गड किल्ल्याची सफर कारणारी माझी हि मुलं आज तंत्रज्ञानाच्या जवळीकते मुळे, इथं बसून गड-किल्ले पाहतात, त्यावर वाहणाऱ्या बेभान वाऱ्याला आणि तुफान पावसाला ते जवळून अनुभवतात. सोशल मीडिया वरून कनेक्ट झालेल्या माझ्या परदेशी शिक्षक मित्रांच्या शाळेत म्हणजेच अगदी साता समुद्रापलीकडील देशात लोक कसे राहतात, व्यवहार कसे चालतात, याचा आस्वाद माझी मुले व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून इथे बसून आस्वाद घेतात. परवा आम्ही व्हिएतनाम मधल्या एका शाळेत कनेक्ट झालो होतो. एकमेकांच्या भाषेबद्दल खूप मोठी अनभिज्ञता असून सुद्धा आमच्या मराठी मुलांनी त्या व्हीएतनामीज मुलाशी इंग्रजीत संवाद साधला. दिसायला जरी हि छोटी गोष्ट असली तरी काहींसाठी मात्र हि मोठी बाब आहे. माझ्या ह्या वर्गातील काही मुलं उद्या त्या देशात प्रत्यक्ष जातील सुद्धा पण जाऊ न शकणाऱ्यांसाठी हा अनुभवही नसे थोडका. मागे एकदा दिवाळी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमेरीकेतील एका पर्यावरणाच्या मॅडमनी आमच्या मुलांशी संवाद साधला. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा फटाके कसे हानी पोहचवतात वगैरे विषयांवर चर्चा झाली. पण यंदा ती चर्चा तिथेच न थांबता एका वेगळ्या प्रकल्पाच्या (वर्ग लायब्ररी) मार्गे उदयाला आली. अगदी ५०-१०० रूपयाच्या फटाक्यांची जागा घेऊन सुरु झालेला १०-१२ पुस्तकांचा हा प्रवास आज चारशे छप्पनवर येऊन थांबलाय. तो असाच अथांग राहील यात तिळमात्र शंका नाही." 


पुढील वाटचाली बद्दल काय मानस आहे? या प्रश्नावर सरांनी दिलेला उत्तरस्वरूपी षटकार तर जबरदस्त होता. "इथं येणारी काही मुलं हि स्थलांतरीत कामगारांची आहेत. त्यामुळं कधी कुठंल्या तरी कारणाने त्यांच्या शाळेला दांड्या ह्या पडतातच. त्या दिवशीचा त्यांचा अभ्यास बूडतो. असा अभ्यासक्र म्हणा किंवा एखादयाला जर शिकायला वेळ लागत असेल, रेगुलर स्पीडला तो मॅच होत नसेल, तर अशा सगळ्या मुलांसाठी 'personalized बेंच' ची संकल्पना डोक्यात आहे. आयडिया सिंपल आहे. विषयाच्या तासानूसार प्रत्येक बेंच वर एक क़्यु आर कोड येईल. ज्याच्या त्याच्या सद्य स्थितीवर आधारीत ज्याला त्याला वैयक्तीक असा पुढील अभ्यासक्रम दिसेल. ह्यामुळे काय होईल तर कुणाच काही सुटणार नाही. अन जरी काही सुटलच, तर काय सुटलं, किती सुटलं हे कळल्यामुळे आणि त्याला डिजिटली आणल्यामुळे ते लवकर कव्हर करणं पण सोपं जाईल."


सरांनी सांगितलेली ती एकेक उदाहरणें ऐकतांना वाटलं, मी नक्की एका मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे, कि कुण्या मोठ्या इंटरनेशनल शाळेत? खरंच कमाल होती. अन हा, यांना सरकारनें काही मंजूर केलय आणि हे लोक फक्त त्याची अंमलबजावणी करतायत, असं नाहीए बर का. एका प्रामाणिक शिक्षकाच्या, मुलांना शिकवण्याच्या, प्रामाणिक तळमळीतून उदयाला आलेली हि संकल्पना आज एका वर्गापुरती का असेना पण सत्यात उतरली होती. पुढचा पल्ला फार मोठा होता पण आता सुरवात नक्कीच झाली होती. हिंदीत एक म्हण आहे बघा, "हम चलते गए, लोग मिलते गए और कारवाँ बढता गया." अगदी तसचं काहीस आज मी तिथं अनुभवत होतो. 


अजून खूप काही जाणून घ्यायची इच्छा होती, पण एव्हाना अडीच तास उलटले होते. पुढे अजून एक नियोजित कामं होत, त्यामुळे आम्हीच जरा आवरत घेतलं. पण आजची षटकांची बरसात, कदाचित अजून बाकी होती. जाता जाता अजून एक जोरदार षटकार पहायला मिळालाच. आमच आभार प्रदर्शन करायला समोर आलेल्या त्या मुलीच फ्लुएन्ट इंग्लिश बघून मला कौतुक वाटल. थोडं अजून तिला जाणून घ्यावं म्हणून मी आपलं सहजच दोन चार प्रश्न विचारले. तशी सगळीच उत्तर, तिने अगदी सफाईदारपणे दिलीत. पण तीचं एक उत्तर मात्र मनात कायमच घर करुन गेलं. प्रश्न होता, "who is your best friend?" पुढच्याच क्षणाला तिच्या तोंडून उत्तर आलं, "माझे टीचर". खरं सांगायच तर मला एक सेकंद काहीच सुचेना काय बोलाव. समोर उभ्या असलेल्या त्या सरांबद्दलचा तो आदर आता द्विगुण पार करुन त्रीगुणीत झाला होता. कारण हेच ते वय असत, जिथं मुलांच्या नाजूक मनाचा आणि कोमल जिवनाचा पाया घडत असतो. अन जर हा पाया घट्ट करणारी मंडळी अशा सुधारीत वृत्तीची असतील, तर कुणाची धाक आहे सांगा, भविष्यात तो पाया कमजोर करण्याची? त्या मुलीच्या त्या प्रेमळ उत्तराला तितंकाच नम्र रिप्लाय करत ते शिक्षक उद्गारले, "खरं तर कोवळया मनाची मुलं असतात हो हि मॅडम. घरी काही झालं, कुणी काही बोललं, कुठं काही प्रॉब्लेम आला, तर अगदी निरागसपणे माझ्या जवळ येऊन सांगतात. मि फार काही नाही करत. ऐकुन घेतो फक्त. आणि माझ्या परीनं जमेल तेव्हडी मदत करतो. बस इतकच." मागल्या वर्षी ऑफिस मध्ये चार तासाचा केलेला तो psychological safety (मानसिक सुरक्षा) नावाचा सेमिनार आज मला असा, चार सेकंदात एक जितजागत उदाहरण देऊन जाईल याची स्वप्नात पण कधी कल्पना पण केली न्हवती मी. 


अर्थात हे सगळं कागदावर आणणे हि यंदाच्या, दोन हजार बावीसच्या कामाची पहिली सुरवात. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच, डोक्याला हा भन्नाट खुराक मिळाल्यावर, मनात योजिलेल्या कामांची गाडी, कमी स्पीडला थोडीच पळवायची? यावर्षी जरा मोठाच पल्ला गाठायचा, नेहमीपेक्षा. बघू... कुठं वर जमतंय सगळं. 


© आराधना खोत