खम्माघणी... राम राम सा... आता तुमी म्हणाल हे बर कुठल नवीन सोंग... तर त्याच काय झालं..... बरोबर अडीच महिन्यापूर्वी आमच्या ऑफिस मधल्या एका मॅनेजर सरांचा मला फोन आला. बोलले, "आराधना, एक volunteerism प्रोग्राम करायचा आहे. आपण वीकएंड ला स्कूल मदे करतो त्या पेक्षा थोडा वेगळा, पण थीम तीच - STEM education. अन या डिसेंबर मध्ये १ वीक साठी राजस्थान ला फील्ड व्हिसिट साठी पण जावं लागेल. आहेस का available?" संधी एव्हडी अप्रतिम होती कि नाही म्हणायचा प्रश्नच न्हवता. जाम आनंद झाला मला. एक तर लय दिवसा नंतर volunteerism ची संधी आणि नव्या राज्यात जायचा योग. अर्थात कोविड न काय नाटकं केली असतीत तर ट्रॅव्हल नसतं झालं म्हणा पण जरा थंड झाला बिचारा अन शेवटी २ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, असा एक वीक चा ऑन फील्ड वर्कशॉप प्लॅन फायनल झाला आणि आम्ही पोहचलो सुद्धा तिथं. आमची फ्लाईट हि दुपारची असल्यान आणि एअरपोर्ट ते हॉटेल असा तब्बल ४ तासाचा प्रवास असल्या कारणान, मस्त लॉंग ड्राईव्ह करत खऱ्याखुऱ्या राजस्थानला अगदी जवळून बघता येणार होत. खरं सांगायच झालं तर माझ्या कल्पनेतल हे राज्य आणि माझ्या डोळ्यांनी त्या दिवशी पाहिलेलं ते राज्य, फार वेगळं होत, छोट्याशा का असेना पण ह्या ४ तासाच्या प्रवासात टिपलेल सारं काही शब्दात उतरवलय, बघा कस वाटतंय...
राजस्थान... बोलें तो वाळवंट आणि कमी पाऊस. हिच काय ती माझ्या डोक्यातली ईमेज. पण पाहतो तर काय? अगदी एअरपोर्ट पासून ते आमच्या हॉटेल पर्यंत, ही गर्द झाडी, तेही रस्त्याचा दुतर्फा. हि नागमोडी वळण, ह्या छोट्या मोठ्या टेकड्या, त्यात सुरु असलेले भले मोठे खाणकामाचे प्रोजेक्ट्स, हा चौपदरी हायवे अन त्याच्या लगोलग असलेले बडे बडे हॉटेल्स, लॉज इत्यादी. खरं तर, खाणकाम वगळता फार काही वेगळं असं वाटलं नाही मला कारण थोड्या बहुत प्रमाणात भारतातील शहर हि सेमच. पण जसजसा हायवे सोडला अन गावभाग लागला तसतस वाटू लागलं, "मन्हे पधारावो थारे देस.", हे बघा आलो मी तुमच्या राजस्थानात.
सगळ्यात पहिला माझ्या नजरेन काही टीपल असेल तर हे - डोक्या वरन अगदी छाती पर्यंत पदर पसरलेल्या आणि त्यामाग चेहरा लपवलेल्या, बोलें तो, घूँघट घातलेल्या त्या बायका. च्या माईला म्हटलं, ह्यांना एवढ पदरामागन दिसत तरी कस? मला वाटलं सरसकट सगळ्या बायका घेत असतील घूँघट पण असं न्हवत. काही अगदी निवांत, खांद्यावर पदर सोडून, रस्त्यान भटकत होत्या किंवा मस्त घराबाहेर च्या अंगणात मैत्रिणीं सोबत गप्पा मारत बसल्या होत्या. असं कस खरं? सेम सेम वयाच्या ह्या बायकांत असा फरक कसा काय? मला पडलेलं हे कुतूहल इतकं होत कि मी आमच्या ड्रायव्हर दादा लाच विचारल, त्यानं मग अगदी डिटेल मध्ये, त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये ह्या घूँघट ची स्टोरी सांगितली. एखाद्या मुलगीच जेव्हा लग्न होत, तेव्हा म्हणजे अगदी बघायच्या कार्यक्रमा पासून सुरु होतो तिचा हा घूँघट प्रवास. सासरिया म्हणजे आपल्या भाषेत सासरी हा घूँघट मोडण म्हणजे पापच बर का. पण हा, हीच लग्न झालेली मुलगी जेव्हा तिच्या पियर ला म्हणजेच माहेरी जाते , तेव्हा हा घूँघट नसला तरी चालत. मग कूट मला जरा लिंक लागली, म्हणजे मगाच्या त्या खांद्यावर पदर सोडलेल्या सगळ्या माहेरवाशिण होत्या तर... असो...
गावांतला तो अरुंद असा आख्खा रस्ता व्यापून टाकलेल्या त्या म्हशींच्या कळपातून वाट काढतांना माझ्या नजरेन अजून एक वेगळेपणा टीपला, तो म्हणजे दुकानांच्या भिंतींवर केलेलं रंगकाम. दुकानाच नाव, पत्ता, दुकानात काय काय मिळत, हे सगळं लिहिलेलं. फक्त वरच्या अंगाला नाही तर आधाराला उभ्या केलेल्या खांबावर सुद्धा. पण ते नुसतं लिहिलं न्हवतं तर त्यावर मनसोक्त रंगरंगोटी सुद्धा केलेली. आपल्या कड कसा एखादा बोर्ड असतो, ज्यावर लिहिलेलं असत बघा, आमच्याकडे अमुक अमुक वस्तू अमुक अमुक दराने मिळेल किंवा दुकानाच नाव गाव पत्ता असलेला तो आयताकृती बोर्ड किंवा फलक म्हणा हवं तर. हा तसच... पण प्रिंटेड काही न्हवत प्युअर कलात्मकतेन रंगवलेल. लयच आवडल मला. कारण अगदी सोप्प होत - तंत्रज्ञानाच्या या जगात, जुनी कला अजूनही कुठं तर जपून आहे. छान वाटलं. कितीही अडवान्स किंवा फॅन्सी डिजिटल प्रिंटिंग आलं तरी हातानं अन नाजूक ब्रश न रंगवलेल्या कलेची सर त्या बोर्डाना थोडीच येणार?
इकडच्या घरांची पण जरा कमालच वाटली मला. म्हणजे आपल्या कडे कस असत, अगदी रस्त्याला चिटकून घर असत किंवा फार फार तर अर्धा माणुस उंचीच कंपाऊंड, मग थोडं अंगण, त्यात एक तुळस मग तुमचा सोपा(हॉल) मग एका मागून एक आतल्या खोल्या. आता जुन्या पद्धतीच्या वाड्यात जायचा तुमचा योग आला तर थोडं चित्र बदललेल दिसेल म्हणा जरा, पण असे वाडे दिसणं आजकाल जरा दुर्मिळच नाही का? तर मी कुठं होतो, हा... तिकडं पाहिलेल्या घरात. तर तिथं पहिला होत, ते दीड-दोन माणसं घालावित एवढ्या उंचीच कम्पाउंड. त्याला शोभेल असाच भला मोठा उभा-आडवा दरवाजा. त्यातन आत गेलं कि हे मोठं आंगण. त्याच्या चारी बाजूला मग छोटा छोटा व्हरांडा किंवा सामान सामान सुमान ठेवायची जागा. त्याला पार केलं कि मग एक मोठा हॉल. ड्राइवर दादा बोलला तस, हे म्हणजे आलेल्या पाहुण्यांना बसायला उठायला केलेली सोय. आता पाहुणा जरा जवळचा असेल तर मग त्याला एन्ट्री मिळते ती अजून एक स्टेप आत. म्हणजे आतल्या हॉल मध्ये. आणि मग त्या नंतर सुरु होत, तुमच खरं घर. तस तिथं कुणाच्या घरी जायचा योग आला नाही म्हणा, पण मग आत आपल्या सारखंच बेडरूम, किचन असं काहीस असत असावं हा आपला अंदाज. तर, असं हे घर जमिनीवर एवढ आडवं पसरलेल होत, कि कदाचित वरचा मजला चढवायची गरजच वाटली नसावी कुणाला. कारण मला तरी तिथं, दुमजलि घर काय दिसलीच नाहीत बुवा, निदान त्या रस्त्याला तरी.
या सगळ्या मध्ये २ घर मात्र फार स्पेशल होतीत. त्याच्या बाहेरच्या मुख्य भिंतीवर कुण्या व्यक्तिच चित्र रेखाटल होत. अन हा, जस वर सांगितलं तस, प्रिंटेड नाही बर का कलात्मक हातांनी केलेली ती कुसर होती. अर्थातच माझा मेंदू ला आता याच उत्तर पाहिजे होत, हि २ घरच का बर वेगळी? अन ज्यांच चित्र काढलय, ते कोण आहेत बरे? आपुसकच मला उत्तर देणारा एकच माणुस होता, आमचा ड्रायव्हर दादा. त्यानं जे सांगितलं ते भयंकर कमाल होत. ऍक्च्युल्ली ते दोन लोक खरच स्पेशल होते कारण त्यांनी गावासाठी किंवा समाजासाठी काही तरी मोलाच योगदान दिलेलं आणि म्ह्णूनच त्यांना कृतज्ञता म्हणून त्याची समाधी (त्यांच वॉल पैंटिंग) त्यांच्या घराबाहेर केलेल. किती छान ना... आवडलं मला हे सुद्धा.
एवढ्या सगळ्या फरकामध्ये एक गोष्ट मात्र ओळखीची दिसली, खरं तर जरा अभिमानाचीच म्हणा हवं तर. एका शाळेचा बोर्ड होता, त्यावर लिहिलं होत, 'सावित्रीबाई फुले, माध्यमिक विद्यालय'... वाह्ह... मुलीच्या शिक्षणासाठी आपल आयुष्य पणाला लावलेल्या आपल्याच सावित्री बाईंच्या कामाचा डंका एवढ्या दूरच्या राज्यात गेलेला बघून कसलं भारी वाटलं काय सांगू, छाती ४ इंच फुललीच म्हणा हवं तर त्या अभिमानान.
एव्हाना आता अंधारून यायला लागलं होत. सूर्यदेवानी आकाशात आपल्या नारंगी छ्टा पांघरून साऱ्या जीवसृष्टीला परतीच्या प्रवासाचा सिग्नल दिला होता. असं असलं तरी राजस्थानातल्या माझ्या त्या प्रवासाला आता कुठं सुरवात झाली होती. दिवस ढळला तरी माझ्या मनातल्या कुतुहलाला आत्ता कुठं जाग आली होती. त्यामुळं माझं मन मात्र अगदी टवटवीत होत, नव्या राज्यातल्या नव्या गोष्टी डोळ्यांनी टीपायला अन मनामध्ये कोरायला, अगदी आयुष्य भरासाठी...
©आराधना खोत