Pune Bus Drive

पुणे - कोल्हापूर... रस्ता तसा नेहमीचाच, गाडी पण नेहमीचीच, महामंडळाची... पण आज मन मात्र नेहमी सारखं न्हवतं... खिडकीबाहेर अस्ताला जात असलेला सूर्यदेव, इतर वेळी, त्याच्या सुर्यास्त सौंदर्यान, मला मस्त मोहित करतो पण आज तोच मोहक सूर्य, मला खूप खोल आणि बोचट अशा आठवणींत घेऊन गेला होता. आता या सगळ्यामध्ये त्याचा दोष नेमका किती हे शब्दात मांडण जरा कठीणच, पण करतो थोडा प्रयत्न. ऐका.... 


तर झालं असं.... मी बसलो होतो समोरून चौथ्या नंबराच्या आणि उजव्या बाजुच्या बाकड्या वर. अन माझ्याच ओळीत डाव्या बाजूला होती, एक जोडी, बाप लेकाची. तस मी फार कुणाच्या गप्पांमध्ये नाक खुपसत नाही म्हणा, पण का कुणास ठाऊक, त्या जोडी कडे माझी सारखी नजर जात होती. एव्हाना त्यांच्या त्या नवख्यापणा वरून आणि माझ्या कानावर पडलेल्या पुसट संभाषणा वरून एवढा तरी अंदाज आला होता कि तो मुलगा १२ पास झालेला आणि आता पुढील कॉलेज प्रवेशासाठी पुण्याला ऍडमिशन साठी गेले होते ते बाप ल्याक. पेहराव तसा साधाच.. अंगात पांढरा सदरा, ढील्लिशी पॅन्ट, पायात आपलं कोल्हापुरी पायतान, हातात एक कापडी पिशवी अन खोल डोळ्यात... कदाचित ढीगभर स्वप्न आणि आशा. मुलगा पण तसा साधाच, जीन्स पॅन्ट,अंगात लाल टी शर्ट, त्याच्या वर एक काळ्या रंगाच जॅकेट, पायात स्पार्क च सॅन्डल, हातात मोबाईल आणि मांडीवर सॅक. तस पहायला गेलं तर हे दृश्य काही वेगळं नव्हत, तस कॉमनच होत. पण माझ्या साठी मात्र ते खास होत, कारण बरोबर ७ वर्ष, ५ महिने आणि ४ दिवसा पूर्वी असंच काहीस एक चित्र कोल्हापूर-पुणे प्रवासात घडलं होत, फरक एवढाच होता, हि बाप-लेकाची जोडी होती आणि ती बाप-लेकीची. हे कॉलेज च्या ऍडमिशन साठी पुण्याला आलेले तर ते कंपनीत जॉब वर हजर राहण्यासाठी पुण्याला चाललेले. 


आपलं घर सोडून परक्या मुलुखात जाण कुणाला आवडत? आई-बाबाची माया, बहीण-भावाच प्रेम, सगळं कसं आयुष्यभर सोबत घट्ट पकडून ठेऊ वाटत आपल्या सगळ्यांनाच. पण नाही ना ठेवत आपण? कुणी स्वप्नांची तर कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी घरा बाहेर पडत. तसच मी पण पडलेलो, माझ्या हिरोचा (माझ्या बाबाचा) हात घरून अशाच एका संध्याकाळी अशाच एका बस मधून, माझ्या स्वप्नांची भूक शमवायला. 


पुण्याच्या हद्दित प्रवेश करताना लागलेले ते मोठाले कैलाश भेळीचे ते पोष्टर जेवढे स्पष्ट आठवतात ना तेवढच स्पष्ट आठवत ते माझ्या बाबाच्या डोळ्यातल प्रेम, स्वप्न, आशा अन त्याच्या जोडीला असलेलं ते पुसटस दुःख, पोटच्या गोळ्याला नव्या शहरात एकट्याला सोडून येण्याच. आपल्या पिल्लांना स्वबळा वर उडता यावं, आयुष्यातल्या अज्ञात परीक्षांना सामना देता यावं, काय चूक, काय बरोबर हे स्व-अनुभवातून शिकता यावं, या मतलबी जगात, कोण आपल, कोण परकं हे अगदी बिनचूक पारखता यावं यासाठीं केलेला तो एक केविलवाणा प्रयत्न किंवा धाडसच होत, माझ्या बाबाच...


आज त्या बाप लेकाच्या जोडीला बघून, माझा हा आयुष्याचा प्रवास झरकन नजरे समोरून गेला. बाबान ज्या विश्वासान हात सोडला होता, तो विश्वास आज अगदी तंतोतंत सार्थ ठरला होता. खूप काही कमावल होत मी अलिकडच्या या वर्षांत. या सगळ्याचा जेवढा आनंद होता ना त्याच्या पेक्षा जास्त एक होत, जे हृदयात खोलवर सतत सलत रहात होत... उंच आकाशात उडायची तालीम दिलेल्या आपल्या पिल्लाला फुटलेले ते बळकट पंख आणि त्या पंखांनी घेतलेली गरुड भरारी बघायला आज माझा बाबा न्हवता... मनुष्य जन्माच्या ५ व्या दिवशी सटवीन लिहुन ठेवलेल ते नशीब म्हणा किंवा नियती म्हणा, ते बदलायचा जरी अधिकार मला नसला तरीसुद्धा कधी कधी माझं मन, का कुणास ठाऊक, अनामिक अशा खोट्या आशेवर धावायला लागलं होत. माझा बाबा मला बघत असेल का? माझी ही भरारी बघून त्याचा पण ऊर अभिमानान भरून येत असेल का? कधी कधी जेव्हा मला खूप एकटं वाटत तेव्हा तोच येत असेल का माझा मूड ठीक करायला? त्याच वेगळं विश्व असेल का? नव्या जगात तो खुश असेल का कि आमच्या सारखं तोही असं कधी कधी भुतकाळात हरवत असेल?


मला माहितीय, माझ्या या प्रश्नाना काही अर्थ नाहीय, किंबहूना काही उत्तरच नाहीय... पण तरी पण मला सारखं सारखं हेच विचारावस वाटत... कदाचित मला माझ्या बाबाला सारखं आठवावस वाटत 🙂🙃


© आराधना खोत