गंगाजळ : वाहिली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ

गेली दोन वर्षं सुरु असलेला, हा कोरोनासोबतचा पाठशिवणीचा खेळ, लसीकरणाच्या मोहिमेनंतर तरी थांबेल, असं अगदी खात्रीन वाटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र तस काही झालं नाही. याला नेमकं काय, कोण आणि किती जबाबदार आहे हे तूर्तास बाजूला ठेऊ. आज थोडा वेगळा विषय मांडावा म्हणतीय. पण त्यासाठी जरा मागे जावं लागेल.


पहिल्या लाटेत, म्हणजे साधारण मार्च दोन हजार वीस मध्ये किती लोकांनी आपले जॉब्स, व्यवसाय आदी गमावलं, याची सरकार दरबारी पण खरी नोंद नसावी. या ना त्या प्रकारे, अगदी प्रत्येकाला या लाटेनं, भयाण वास्तवतेची एक जोरदार चपराक मारली. कुणी जवळची माणसं गमवलीत तर कुणी पोटा-पाण्याची शाश्वती. ह्यातून जे तारले त्यांचं म्हणाल, तर कमी अधिक प्रमाणात तेही नैराश्याच्या जाळ्यात आपसूक ओढले गेले. अर्थात हे सिद्ध करायला कोण्या मानसोपचारतज्ञाकडे जायची गरज ती कशाला? स्वतःच स्वतःला विचारून पहा ना? पूर्वी ताप किंवा साधी सर्दी आली तरी, "हम्म... त्येला काय होतंय?" असा सहज डायलॉग मारणाऱ्या आपल्या मनात, क्षणासाठी का असेना, "कोविड तर झाला नसेल न्हवे?" असा विचार एकदातरी तरळून गेलाच असेल. हे झालं फक्त आरोग्याच. देशातील भावी पिढीच्या भविष्याचं म्हणजे शाळांचे काय हाल सुरु आहेत हे आता नव्याने सांगणे नको. खरं तर शाळा म्हणजे मुलांच सर्वांगिण विकासाच एक संस्कार केंद्र. पुस्तकं वाचता येणं अन परीक्षा लिहिता येणं इथं वर शाळा कधीच मर्यादित न्हवती. पण ऑनलाईन शाळा सुरु झाल्या पासून लिहणं-वाचनं आणि ऑफलाईन पेपर सोडवून देणं, एवढंच काय ते यांत सीमित झालय. पिटी, कार्यानुभव, कला, हस्ताक्षर, वक्तृत्व, निबंध, संगीत वगैरे चे तास, त्यांत होणाऱ्या स्पर्धा आणि त्यातून घडणारं व्यक्तीमत्व, याला शाळा सोडून दुसरा कोणता बरं ठोस पर्याय आहे?


आपल्याकडे पूर्वीपासून एक म्हण प्रचलित आहे, 'झालं गेलं गंगेला मिळालं'. अगदी त्याच नजरेनं या विषयाकडे पहायचं म्हटलं, तरी खूप काही बदलण्यासारख आहे. अर्थात भुतकाळानं दिलेल्या जखमा अशा सहजासहजी भरू शकणाऱ्या नसल्या तरी गतकाळानं दिलेल्या त्या धड्यांची मलमपट्टी लावून त्या हळूहळू बऱ्या नक्कीच करता येतील. काय गेलं, यापेक्षा काय उरलं हे जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर निदान पुढच आयुष्य तरी सुखकर होईल किंवा ते जगायला एक नवी उमेद येईल. कोविडन एखाद्या माणसाच शरीर नेल असेल पण त्याच्या आठवणी? त्या तर हृदयाच्या कप्प्यांत कधीच सीलबंद झाल्या असतील. नाही का? त्या माणसासोबत घालवलेला प्रत्येक क्षण असो किंवा त्यानं दिलेल्या प्रत्येक शिकवणीची पुंजी असो, कोविड सारखे छप्पन आले तरी ते हिरावून नाही नेऊ शकत. तो माणूस फक्त नजरेआड झाला असेल, कल्पनेआड नक्कीच नाही. 

मध्यंतरी, आमच्याच गल्लीतल्या एका चाळीशीतल्या दादाला आम्ही गमावल. झाडांवर त्याच नितांत प्रेम होत. स्वतःच्या अंगणातल्या झाडाला सगळेच जपतात, पण ह्याचं गणित जरा वेगळं होत. रोज अगदी न चुकता हातात फावड, खुरपं, पिशवीत कसल्यातरी बिया आणि गाडीला बांधलेला पाण्याचा छोटा कॅन घेऊन हा गडी घरातून निघायचा. गेल्या काही वर्षात त्यानं आणि त्याच्या सवंगड्यांनीच उभारलेल्या रस्त्याकडेच्या हिरवळीची देखभाल करणे आणि सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत आपल्या या थोर कामात इतर लोकांना सहभागी करुन घेणे हेच कदाचित त्याच जीवनकार्य बनलं असावं. आज तो दादा नाहीए, पण आजही त्या झाडांकडे पाहिलं, तरी त्याची आठवण येते. गोष्ट इथं थांबत नाही. आपला खास मित्र गमावला म्हणून रडत बसणं आणि नशिबाला दोष देणं हा साधा सरळ मार्ग. पण त्याचाच एक जवळचा मित्र, त्याला बहुदा हे मान्य नसावं. अगदी बारा बारा दिवस सुतक पाळणाऱ्या आपल्याच समाजातला हा गडी, दुसऱ्या दिवशी उठला अन त्या दादानं सुरु केलेल्या कामाला जाऊन स्वतःच जुंपला. गंगेच्या रूपान कदाचित तो दादा वाहून गेला असेल, पण तीर्थरूपी काही सोडून गेला असेल, तर हेच ते, गंगाजळ - 'गेलेल्या माणसाचा वियोग करत बसण्यापेक्षा त्यानं सुरु केलेल्या कुठल्या तरी समाजोपयोगी कामात हातभार लावणं किंवा ते पुढ नेणं'. 


वर म्हटलं तस, शाळा बंद झाल्या म्हणून आपल्याच मुलांच शिक्षण भगवान भरोसे किंवा सरकारच्या टाळेबंदी विषयक नियमांवर अवलंबून न ठेवता जर आपणच थोडा पुढाकार घेतला तर देशाची भावी पिढी अंधकारात हरवण्यापासून नक्कीच वाचू शकेल. शाळेत मुलं फक्त अभ्यास नाही तर खूप काही शिकतात. मग ती मूल्ये असोत, माणसं असोत, शिस्त असो, सामाजिक होणं असो किंवा नाती असोत. निदान कोविडचा समूळ नाश होई पर्यंत हे सगळं जरी प्रत्यक्ष उपस्थितित शिकणं शक्य नसलं, तरी ऑनलाईन व्यासपीठांचा यासाठी कसा वापर करता येईल, हे तरी आपण करूच शकतो. ह्याचचं एक उत्तम उदाहरणं म्हणजे आमच्या गावातील एका शाळेतले एक ध्येयवेडे शिक्षक. यांनी नेमकं काय पाहिजे तेचं हेरलं आणि एक प्रोजेक्ट बनवला. गेली वर्षभर, एकीकडे ऑनलाईन तासांच निम्मित घेऊन तासनतास मोबाईल हातात घेणाऱ्या बालचमूंसाठी आणि दुसरीकडे स्मार्टफ़ोन घ्यायला परवडत नाही म्हणून शिक्षण प्रवाहाच्याच बाहेर राहिलेल्यांसाठी, हा प्रोजेक्ट म्हणजे एक पर्वणीच ठरली. बाकी क्षेत्रातल्या आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी विज्ञानासारख्या विषयाचा आख्खा अभ्यासक्रम जिथं प्रयोगशाळा लागते, छोटी मोठी उपकरणे लागतात त्याला घरामधे आणलं. म्हणजे, लिटमस पेपर ला हळदीने रिप्लेस करून आणि आम्ल ऍसिड ला लिंबू ने रिप्लेस करुन सरांनी अगदी घरी उपलब्ध होणाऱ्या पदार्थांत साध्या सोप्या शब्दांत विज्ञान उतरवलं. गणिताच्या काही लांबलचक सिद्धांतांना तर कल्पकतेची जोड देऊन मुलांना आवडणाऱ्या परीकथांमध्ये आणलं. जिथं शक्य झालं तिथं 'टॉय मेकिंग' सारखे गेम तयार केले जेणेकरुन हसती खेळती शाळा ही आता घरातच भरेल. अर्थात हे सगळं ऑनलाईन अपलोड करणें आणि मुलांना सबमिट करायला सांगणं केव्हाही सोपं. पण मुलांच्या नाजूक आरोग्याचा विचार न करतील तर हे सर स्वतःला ध्येयवेडे कसे बरे म्हणवतील? आपल्या पदरचा पैसा घालून, शंभरच्या वर प्रिंटा मारून आपल्या संपूर्ण वर्गाला ह्यांनी हे सगळं मटेरियल पार्सल करविलं. ऑनलाईन फूड डिलिव्हरी आल्यावर जशी पोटाची भूक शमते तशी हि शिक्षणाची होम डिलिव्हरी आल्यावर मेंदूची भूक थोडी तरी नक्कीच शमली असेल त्या मुलांची. नाही का? ऑफलाईन शाळा बंद झाल्या म्हणजे त्यात मिळणार शिक्षण किंवा होणारा विकास, तुर्तास थोड्या काळासाठी का असेना पण गंगेच्या रूपात वाहून गेला असला तरी, मागे उरलेलं हे गंगाजळ - 'एका ध्येयवेड्या शिक्षकाची हि मुलांना शिकवण्याची धडपड आणि त्यातून साकार झालेलं नाविन्य', हेही नसाव थोडंक.  


शोधायला गेलो तर अशी एक ना असंख्य उदाहरणे, आपल्याच आजूबाजूला सापडतील. गरज आहे ती फक्त नजरेवर आलेलं भीतीच धुकं थोडं बाजूला सारून, समोर पडलेल्या त्या गंगाजळाला टीपण्याची. जे उरलं ते पवित्र आणि मोलाच मानून त्याच सोनं करण्याची. 


© आराधना खोत